Friday, June 4, 2021

 

बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी सतर्क रहा

                                                                 -         जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

                        जिल्हास्तरीय निविष्ठा नियंत्रण समितीची सभा बियाणे, खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याच्या सूचना

 


 

(जऊळ्का एक्सप्रेस न्युज)दि. 04:जिल्ह्यात आगामी काही दिवसांत पावसाचे आगमन होईल. त्यामुळे शेतकऱ्यांकडून बियाणे, खते खरेदी सुरु झाली आहे. बोगस बियाणे, खतांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये, यासाठी कृषि विभागाने सतर्क राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, २ जून रोजी झालेल्या जिल्हास्तरीय निविष्ठा नियंत्रण समितीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विकास बंडगर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था श्री. गाडेकर यांच्यासह विविध बियाणे, खते उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषि सेवा केंद्र असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील बियाणे, खतांची उपलब्धता, बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, खरीप पीक कर्ज वितरण आदी बाबींचा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आढावा घेतला. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध होण्यासाठी कृषि विभागाने केलेल्या नियोजनानुसार संबंधित कंपन्यांकडून पुरवठा होत असल्याची खात्री करावी. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात बियाणे अथवा खतांचा तुडवडा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कृषि विभागाने सातत्याने बिजोत्पादन, खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या संपर्कात राहून त्यांना शासनाच्या निर्देशानुसार बियाणे, खते वितरणाबाबत सूचित करावे. बियाणे, खतांची विक्री चढ्या दराने होणार होवू नये, यासाठी खबरदारी घ्यावी. तसेच कृषि विभागाच्या भरारी पथकांच्या माध्यमातून बियाणे, खतांची गुणवत्ता तपासावी. जिल्ह्यात आतापर्यंत ५० टक्के पेक्षा अधिक पीक कर्जाचे वितरण झाले आहे. उर्वरित पीक कर्जाचे वितरण १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ ठेवून जिल्हा मध्यवर्ती बँक व सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी आवश्यक कार्यवाही करावी. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळेल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी दिल्या. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. तोटावार म्हणाले, बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी कृषि विभागामार्फत पथके तयार करण्यात आली असून त्याद्वारे बियाणांचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहे. नुकतेच मानोरा येथे ५ लक्ष ८२ हजाराचे बियाणे जप्त करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. चढ्या दराने बियाणे, खते विक्री होत असल्यास कृषि विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले असून सर्व कृषि सेवा केंद्रांवर कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती श्री. तोटावार यांनी दिली. कृषि विकास अधिकारी श्री. बंडगर म्हणाले, सर्व रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी जिल्ह्यातील खतांच्या वितरणाबाबतची माहिती कृषि विभागाला त्वरित उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून खत विक्रीचे संनियंत्रण करणे शक्य होईल. तसेच ‘पॉस’ मशीन कार्यान्वित असलेल्या विक्रेत्यालाच खतांचे वितरण करावे, असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

  लसीकरण हलगर्जीपणा भोवला दोन ग्रामसेवक निलंबित वाशिम दि.19 (जिमाका) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याच...