‘कोरोनामुक्त
गाव पुरस्कार’ योजनेत
सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
वाशिम, दि.
११ (जिमाका) : ग्रामीण भागातील
कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन
त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त
व्हावे, यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत आहे. या
स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३
ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये,
२५ लाख रुपये व १५ लाख रुपये याप्रमाणे
बक्षीस दिले जाणार. तरी वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत सहभागी
व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.
कोरोना रुग्ण संख्येमध्ये पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या
लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. तसेच तिसऱ्या लाटेत
लहान मुलांना कोविड संसर्ग तुलनात्मकदृष्ट्या जास्त प्रमाणात होण्याचा धोका
वर्तविला गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोविड संबंधित चाचण्या होणे व गावातच
संस्थात्मक विलगीकरण होणे आवश्यक आहे. गावातील सर्दी, ताप, खोकल, हगवण, डोकेदुखी, मधुमेह, अशक्तपणा, फुफ्फुसांचे आजार असणाऱ्या
रुग्णांना तातडीने कोविड तपासणी करण्यासाठी प्रोत्साहित करणे, येणाऱ्या काळात लहान
मुलांवर विशेष लक्ष केंद्रित करणे,
तसेच पाण्याची सुविधा, शौचालय, पंख अशा सुविधा
असलेल्या इमारती संस्थात्मक विलगीकरणासाठी निश्चित करणे, अशा इमारतींमध्ये
किमान १० बेडची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
आपले कुटुंब, आपली गल्ली-मोहल्ला,
वाडी-वस्ती, आपले गाव कोरोनामुक्त
केले तर तालुका, जिल्हा व राज्य कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही.
गावागावांमध्ये कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न व्हावेत,
यासाठी ‘कोरोनामुक्त गाव पुरस्कार’
योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला
आहे. या शासन निर्णयानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने कोरोनामुक्तीसाठी ग्रामपंचायत
स्तरावर ५ पथकांची स्थापना करुन त्यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवावयाचे आहेत.
यामध्ये ग्रामपंचायत प्रभागनिहाय कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष स्थापन
करुन त्यासाठी कार्यवाही करणारे पथक,
करोना तपासणीसाठी व रुग्णांना
रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहन चालकाचे पथक, कोविड हेल्पलाईन पथक
आणि लसीकरण पथक या पथकांचा समावेश असेल.
या निकषानुसार गुणांकनाबाबतचे स्वयंमुल्यांकन तयार करून १
महिन्याच्या कालावधीत संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावे. गट विकास
अधिकारी यांनी प्राप्त झालेल्या सर्व स्वयंमुल्यांकनाच्या प्रस्तावाची तपासणी करून
सर्वाधिक गुण प्राप्त १० ग्रामपंचायतींची निवड करून प्रस्ताव पुढील कार्यवाहीकरिता
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करावा, मुख्य कार्यकारी
अधिकारी या प्रस्तावांचे गुणांकन करून सर्वाधिक गुण प्राप्त तीन गावांची शिफारस
विभागीय आयुक्तांकडे करतील. विभागीय आयुक्त स्तरावर प्राप्त झालेल्या प्रस्तावांची
छाननी करून सर्वाधिक गुण प्राप्त होणाऱ्या विभागवार प्रथम, द्वितीय व तृतीय
क्रमांकाच्या ग्रामपंचायतींची अंतिम निवड विभागीय आयुक्त करणार आहेत.