Tuesday, May 25, 2021

लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांचे गावपातळीवरच संस्थात्मक विलगीकरणावर करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. वाशिम, दि. २४ ( जऊळका एक्सप्रेस न्युज ) : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी बाधित रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण करणे आवश्यक आहे. याकरिता गावामध्येच विलगीकरण कक्षाची स्थापना करून लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांना त्याठिकाणी संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात यावे. या विलगीकरण कक्षामध्ये सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले. दुरदृश्य प्रणालीद्वारे आज, २४ मे रोजी आयोजित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी (महसूल) सुनील विंचनकर, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, हा संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांचे विलगीकरण गावपातळीवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता गावामधील शाळा, समाज मंदिर अथवा मुलभूत सुविधा उपलब्ध असलेल्या इतर ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे नियोजन करून गावपातळीवर विलगीकरण कक्ष सुरु करण्याची कार्यवाही करावी. या कक्षामध्ये सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच आगामी पावसाळ्याच्या दिवसांत रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांना गावातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असून सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर स्वतंत्र विलगीकरण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

  लसीकरण हलगर्जीपणा भोवला दोन ग्रामसेवक निलंबित वाशिम दि.19 (जिमाका) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याच...